मुंबई - रेस्टॉरंट, मॉल्स आणि हॉटेल्सना वेळ वाढवून देण्यासंदर्भात राज्य सरकारची चर्चा सुरू आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये या बाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यात निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. 15 ऑगस्टपासून दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देखील राज्य सरकारने दिली आहे. मात्र हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि मॉल्स अद्यापही चार वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी राज्य सरकारने नियम ठेवले आहे. त्यामुळे वेळ वाढवून देण्यासंदर्भात व्यवसायिक राज्य सरकारकडे मागणी करत आहे. या मागणीचा राज्य सरकारकडून विचार सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे शेख यांनी सांगितले. आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. इनडोअर गेम सुरू करण्याचा विचार टप्प्याटप्प्याने सर्व निर्बंध शिथिल करण्याचा विचार असून मॉलमध्ये किंवा इतर ठिकाणी इनडोअर गेम सुरू करण्याचा विचार देखील राज्य सरकारचा असल्याचे अस्लम शेख यांनी यावेळी सांगितले.
निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारने घाईघाईने निर्णय घ्यावे, यासाठी विरोधक आंदोलन करत आहेत. मात्र विरोधकांच्या दबावाला राज्य सरकार बळी पडणार नाही. टास्क फोर्सच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जातील. निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून प्रत्येक गोष्टीचा विचार करत आहे, त्यासंबंधी चर्चा करत आहेत आणि त्यानंतरच निर्णय घेतले जाईल, असेही अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.
'राज्यात लसीचा तुटवडा'
अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे अनेक वेळा लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. लसीचा साठा व्यवस्थित उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे वेळोवेळी मागणी केली जाते. विरोधकांनी या बाबीचा देखील विचार केला पाहिजे. राज्याला मुबलक लस मिळावी यासाठी विरोधकांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत, असा टोला देखील यावेळी अस्लम शेख यांनी विरोधकांना लगावला आहे.