मुंबई - दिल्लीत काँग्रेसचा झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. आमची तिथे ताकद नव्हती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे षडयंत्र दिल्लीकरांनी ओळखले आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, अशी प्रतिक्रिया वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश
विधानभवनात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून त्या दरम्यान, शेख यांना दिल्ली विधानसभा निकालाच्या संदर्भांत विचारले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदी -शाह या जोडीने सीएए, एनआरसी आणि हिंदू मुस्लीम यांच्यात दरी निर्माण करण्यासाठी मोठे रान पेटवले होते. अनेक प्रकारचा खोटा प्रचार केला, मात्र दिल्लीकरांनी त्यांना ओळखले असल्याने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. आम्हाला या निवडणुकीत अपयश आले असले तरी, आम्ही त्या अपयशाचे कारणे शोधणार आणि त्यावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीत भाजपने जंग जंग पछाडूनही त्यांना सत्ता काबीज करता आली नाही, जनतेने त्यांना रोखले असल्याने देशात यासाठीचा एक चांगला मेसेज गेला असल्याचेही ते म्हणाले.