मुंबई - मध्य रेल्वेकडून उन्हाळ्यातील सुट्टी आणि रेल्वेमध्ये गर्दीचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी विशेष साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येतात. यंदाही मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मिनी लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकून पडलेल्या परप्रांतीय श्रमिक मजुरांना या गाड्यांचा आपल्या राज्यात जाण्यासाठी विशेष फायदा होणार आहेत.
तीन विशेष गाड्याचा होणार फायदा-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या परप्रांतीय कामगारांनी गावाकडची वाट धरली असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यातच आता मध्य रेल्वेने मुंबई ते गोरखपूर, मुंबई ते दरभंगा आणि मुंबई ते पाटणा दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांची मदत परप्रांतीयांना राज्यातून बाहेर पडण्यासाठी होणार आहे.
मुंबई-गोरखपूर विशेष एक्सप्रेस -
गाडी क्रमांक मुंबई-गोरखपूर विशेष रेल्वे 13 आणि 20 एप्रिल रोजी एलटीटीहून दुपारी 4.40 वाजता सुटेल. तर, ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री २ वाजता गोरखपूरला पोहचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज , वाराणसी, मऊ, बेलथारा रोड, भटनी, देवरिया येथे थांबा देण्यात येणार आहे.
मुंबई-पाटणा विशेष एक्स्प्रेस -
गाडी क्रमांक 01091 मुंबई-पाटणा अतिजलद विशेष रेल्वे 12, 15 आणि 19 एप्रिल रोजी सीएसएमटीहून सकाळी 11.05 वाजता सुटेल. तर, दुसर्या दिवशी दुपारी 2.30 पाटणा येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा येथे थांबा देण्यात येणार आहे.
मुंबई-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस-
गाडी क्रमांक 01093 मुंबई-गोरखपूर विशेष रेल्वे 7, 12, 14, 19 एप्रिल रोजी सीएसएमटीहून रात्री ११.३० वाजता सुटेल. तर, तिसऱ्या दिवशी सकाळी 11.40 वाजता गोरखपूरला पोहचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर, लखनऊ, गोंडा, बस्ती येथे थांबा देण्यात येणार आहे.
मुंबई- दरभंगा विशेष एक्स्प्रेस-
गाडी क्रमांक 01097 मुंबई- दरभंगा अतिजलद विशेष रेल्वे 12, 19 एप्रिल रोजी एलटीटीहून सकाळी 8.05 वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी दरभंगा येथे दुपारी 4.10 वाजता पोहचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर येथे थांबे देण्यात येणार आहेत.
प्रवासासाठी आरक्षित तिकीट अनिवार्य-
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना विशेष गाड्याचे विशेष शुल्कासह बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. फक्त
कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.