मुंबई - 'म्हाडा'मध्ये घर मिळवून देतो म्हणून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला आहे. मात्र, चक्क पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस शिपायाने एका माजी गृहराज्यमंत्री यांच्या नावाचा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या पोलीस शिपायाने म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो म्हणून एकाकडून 25 लाख रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा... 'मुंबईच्या 'मातोश्री'चा शक्तीपात, तर दिल्लीची मातोश्री शक्तीशाली'
2011 ते 2015 च्या दरम्यान मुंबई पोलीस दलात काम करणारा नितीन गायकवाड या आरोपीने, आपली गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी चांगली ओळख आहे. असे सांगून मला पंचवीस लाख द्या, मी तुम्हाला म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यानुसार त्याने एकाकडून पैसे उकळले आहेत. या सगळ्या प्रकारानंतर घरही नाही आणि पैसेही परत न मिळाल्याने पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गायकवाड याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केला.
हेही वाचा... चीनमधील भारतीयांना 'एअरलिफ्ट' करण्यासाठी विशेष विमान आज होणार रवाना..
पीडित व्यक्ती जगन्नाथ भिकाजी कदम यांनी आरोपीला वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून पैसे दिले होते. मात्र, त्यांना पैसे आणि घर या दोन्ही गोष्टी न मिळाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. सध्या आरोपी गायकवाड याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आरोपी नितीन गायकवाड हा याआधी माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. याचाच फायदा घेऊन म्हाडामध्ये तुम्हाला स्वस्तामध्ये राहायला देतो आणि नंतर तुमच्या नावावर करून देतो, असे त्याने अमिष दाखवले. तसेच त्यासाठी 25 लाखांची मागणी केली. याप्रकरणी मुंबईतल्या एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तेसच त्याला मुंबई पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले आहे.