मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेला बंडानंतर आजही महाविकास आघाडी सरकारचा नेत्यांच्या बैठकांचे सत्र सातत्याने सुरू होते. राज्यातील सर्व बारीक घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बारीक लक्ष असून, आज ( रविवारी ) शरद पवार यांनी सकाळपासूनच बैठका घेणे सुरू केले होते. आज सकाळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक ( Sharad Pawar Silver Oak House ) निवास्थानी महाविकास आघाडीतील ( Meeting of leaders of Mahavikas Aghadi ) नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून शिवसेना खासदार अनिल देसाई आणि मंत्री अनिल परब उपस्थित होते, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीने पुढील कोणते पाऊल उचलावे याबाबत चर्चा झाली. खासकरून आमदारांच्या सदस्यत्व रद्द करण्याबाबतच्या नोटीस नंतर एकनाथ शिंदे गटात होणाऱ्या हालचाली बाबत या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे.
बंडखोर मंत्र्यांची मंत्रिपदे काढण्याबाबत चर्चा : एकनाथ शिंदे गटात असलेल्या मंत्र्यांचे मंत्रीपद काढून घेण्याबाबतचा कानोसा या बैठकीत घेण्यात आला. एकनाथ शिंदे गटामध्ये मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री बच्चू कडू, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री संदिपान भुमरे, आणि मंत्री दादा भुसे यांची मंत्रिपदे काढण्यासाठी कायदेशीर बाबींची पडताळणी या बैठकीत घेण्यात आली.
केंद्रीय सुरक्षेबाबत बैठकीत चर्चा : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक जवळपास एक तास पार पडल्यानंतर शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे दाखल झाले. बंडखोर आमदारांपैकी पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. प्रत्येक 15 आमदारांच्या घरी सी आर पी एफची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात आता केंद्र सरकारचा हस्तक्षेप झाला आहे. त्यातच शिवसेनेचे बंडखोर आमदार त्यांचे समर्थक आणि शिवसैनिक असा वाद राज्यभरात पेटण्याची शक्यता आहे. यातून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबाबतची चर्चा या बैठकीत शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात झाली.
शरद पवारांची दिल्लीवारी : एकनाथ शिंदे गटाला तांत्रिक मुद्द्यावर अडकवण्यासाठी शरद पवार रणनीती आखत आहेत. कालच एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांचा सदस्यत्व रद्द व्हावे यासाठी नोटीस बजावल्या आल्या असून, या 16 आमदारांना सोमवार पर्यंत आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. महाविकास आघाडीकडून उचललेले हे पाऊल एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता निर्माण करणारा आहे. शरद पवार यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांनी सूत्रे हाती घेतली आहे. केवळ मुंबईच नाही तर दिल्लीतही याबाबत महत्त्वाची चर्चा करण्यासाठी शरद पवार दुपारी दीड वाजताच्या सुमारास निघाले. दिल्लीत राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार या काही महत्त्वाच्या बैठकी घेणार आहेत. मात्र या वेळी महाराष्ट्रात उद्भवलेला राजकीय पेच प्रसंगावर देशातील विरोधीपक्षसोबत चर्चा करणार आहेत. तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना सोबत महाराष्ट्रात उद्भवलेल्या सत्ता प्रश्नांवर देखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Meeting On Silver Oak : सरकार टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई; सिल्वर ओकवर बैठक