मुंबई - राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची दुपारी १२ वाजता शिवसेना भवन येथे बैठक बोलावण्यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते मार्गदर्शन करतील. शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची वर्णी लागल्यानंतर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली, ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी
युतीसाठी भाजपकडून दबाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात सत्ता बदलाचे वारे सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेते, विशेष करून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, यासाठी दबावही टाकला जात आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर हे प्रकरण प्रकर्षाने पुढे आले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चांना पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्णविराम दिला. तत्पूर्वी विधान भवनात गोंधळ घालणाऱ्या बारा आमदारांचे एका वर्षाकरिता निलंबन करून ठाकरे सरकारने भाजपला थेट अंगावर घेतले. शिवसेना आणि भाजपमधील हा वाद आता रंगण्याची चिन्हे आहेत.
आघाडीचे अनेक नेते आमच्या संपर्कात - नारायण राणे
सरकारला वाचवण्यासाठी आमदारांचे निलंबन झाले आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काहीतरी दगाफटका होईल आणि त्यामुळे सरकारही कोसळेल, अशी भीती सत्ताधाऱ्यांना आहे. मात्र, यांनी जरी बाराचे निलंबन केल, तरी आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधीच केले आहे.
शिवसेना-भाजप संघर्ष पेटणार
राज्यात महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपकडून विविध यंत्रणांचा दबाव टाकला जातो, असा आरोप आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सातत्याने होतो आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची वर्णी लावून भाजपने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर, केंद्राने मंत्रिमंडळात सध्या स्थान दिले आहे, मात्र कोणाला अंगावर घ्यायचे, हे सांगितले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना देत वातावरण निर्मिती केली आहे. तर, शह वगैरे काही नाही, कोकण आणि शिवसेना यांच्यात कधीच अंतर राहिले नाही. त्यामुळे, कोण कोणाला अंगावर घेतो ते बघूया, असा सूचक इशारा खासदार अनिल देसाई यांनी दिला. त्यामुळे, शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्षाचा वानवा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - दिलीप कुमार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप