मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेल्या शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि जैद विलंत्री यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा मेडिकल टेस्टसाठी नेले आहे. त्या अगोदरच रिया चक्रवर्ती ही पुन्हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर झाली होती.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सर्वात महत्त्वाचे धागेदोरे रिया चक्रवकर्तीच्या हातात असल्याने तिची ईडी, सीबीआय, नार्कोटिक्स ब्युरो कडून चौकशी सुरू आहे. आत्महत्येचा तपास सीबीआयकडे गेल्यापासून चौकशींचे सत्र सुरू आहे. मागील महिन्यापासून रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती तसेच सुशांतचा अकाऊंटंट सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान सुशांत ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले. तसेच रिया चक्रवर्ती आणि शोविक यांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याची कबूली दिली आहे. यानंतर त्यांची काल वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज पुन्हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून त्यांना मेडिकलसाठी नेण्यात आले आहे.