मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज झाडाझडती घेतली. यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दैनंदिन उपस्थिती रजिस्टर तपासणी करून त्यांच्यापैकी किती कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित आहेत, याची महापौरांनी पाहणी केली. महापौरांच्या अचानक भेटीमुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान या भेटी दरम्यान कोरोना रुग्णांनी बरे झाल्यावर प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन महापौरांनी रुग्णांना केले.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी हजर नसल्याच्या नेहमीच तक्रारी केल्या जातात. याची शहानिशा करण्यासाठी महापौरांनी सायन येथील लोकमान्य टिळक म्हणजेच सायन रुग्णालयाला भेट दिली. यावेळी महापौरांनी उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना पीपीई कीट घालून रुग्णांचे मनोबल वाढवले. तसेच डॉक्टर नर्स चांगली सेवा देतात का, या याची विचारपूस केली. रुग्णालयाकडूनही योग्य सोयी सुविधा औषधे वेळेवर दिली जातात का, याचीही विचारपूस केली. चतुर्थ श्रेणी कर्मचारी नेहमी गायब असतात, अशी तक्रार असल्याने कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती रजिस्टरमध्ये किती कर्मचारी हजर आहेत आणि किती कर्मचारी काम करत आहेत याची माहिती घेऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती महापौरांनी घेतली. रुग्णसेवेमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये, म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयुक्तांची भेट
या भेटीदरम्यान महापौरांनी युनियनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच रुग्णालय कर्मचाऱ्यांची सुद्धा बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे केली. याबाबत महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महापौरांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यासोबतच रेल्वेच्या जलद थांब्यांवरून महापालिका रुग्णालयांपर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी युनियनचे पदाधिकारी यांनी यावेळी महापौरांकडे केली. याबाबतसुद्धा महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
प्लाझ्मा डोनेट करण्याचे केले आवाहन
सायन रुग्णालयातील भेटीदरम्यान महापौरांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना भेट दिली. या भेटीदरम्यान कोरोनामधून बरे झालेल्या एका रुग्णामुळे तीन जणांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने रुग्णांनी बरे झाल्यावर प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन महापौरांनी केले.