मुंबई - गेले आठवडाभर छातीत दुखत असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना परेल येथील ग्लोबल या खासगी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर महापौरांना आज (बुधवारी) डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती स्थिर असून काही दिवस त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज -
मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांनी एक आठड्यापुर्वी मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात टू डी इको चाचणी केली होती. त्यात त्यांना छातीत का दुखत आहे हे स्पष्ट झाले नव्हते. रिपोर्ट चांगले असले तरी त्यांच्या छातीत दुखणे कमी झाले नव्हते. शुक्रवारपासून त्यांचे दुखणे वाढल्याने अखेर रविवारी महापौर परेल येथील ग्लोबल या खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर दोन दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. आज त्यांना दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी महापौरांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सपकाळ, सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले आहेत.