मुंबई - बोरिवली येथील भाजपा नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात एका महिलेला पद देतो सांगून छेडछाड करण्यात आली आहे. तसेच या महिलेला मारहाणही करण्यात आली आहे. यावर आता भाजपा गप्प का, भाजपच्या स्टंटबाजी करणाऱ्या ताई कुठे गेल्या? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - संयुक्त किसान मोर्चाची 27 सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक, भाजप वगळता सर्व पक्षांचा बंदला पाठिंबा
- आता त्या महिला कुठे आहेत -
मुंबईच्या बोरिवली येथील भाजपच्या नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात एका महिलेला पद देतो असे सांगून छेडछाड करण्यात आली आहे. हा प्रकार त्या महिलेने स्थानिक खासदार व आमदारांना पत्र लिहून कळवला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या महिलेला नगरसेविकेच्या कार्यालयात बोलावून मारहाणही करण्यात आली आहे. यावर महापौर बोलत होत्या. इतर ठिकाणी महिलांबाबत काही घटना घडल्यास भाजपच्या महिला नेत्या, कार्यकर्त्या खोटं रडून दाखवता, महाराष्ट्राला बदनाम करतात. आता त्या कुठे आहेत? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे सरकार असलेल्या राज्यातही महिलांवर अत्याचार होतात. त्यावेळीही भाजपच्या महिला कार्यकर्त्या गप्प बसलेल्या असतात, असा टोला महापौरांनी लगावला आहे.
हेही वाचा - मुंबई : भाजपा कार्यालयात बोलावून पदाधिकाऱ्याचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न
- चित्रा वाघ कुठे गेल्या? -
मुंबईसह महाराष्ट्रात कुठेही महिलांवर अन्याय, अत्याचार झाला की चित्रा वाघ पब्लिकमध्ये स्टंटबाजीसाठी पुढे येतात. महिलांच्या प्रश्नावर त्या रडतात. आज बोरिवलीचा प्रकार झाल्यावर त्यांचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. आता चित्रा वाघ कुठे आहेत? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं, असे महापौरांनी म्हटले आहे.
- शाळांबाबत दिवाळीनंतर निर्णय -
महापालिका शाळेत विशेषतः मध्यमवर्ग, झोपडपट्टीतून विद्यार्थी येतात. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना विषाणूच्या प्रसाराचा आणि परिस्थितीचा विचार केला जाईल. दिवाळीनंतरच्या वेळेनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. मागच्या वेळी देखील सगळीकडे शाळा चालू झाल्या, पण मुंबईत शाळा सुरु झाल्या नाहीत, असे महापौर म्हणाल्या.
हेही वाचा - धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य