मुंबई - शहरातील गणेश विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी विसर्जनासाठी येणार्या गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द कराव्यात. कर्मचारी त्या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करतील, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक "गणेशोत्सव २०२०" मार्गदर्शक सूचना तयार केली आहे, त्याच्या प्रकाशन प्रसंगी पेडणेकर बोलत होत्या.
मुंबईतील प्रमुख गणेश विसर्जन स्थळांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपमहापौर अँड. सुहास वाडकर यांच्यासमवेत आज पाहणी केली. तयारी कामांचा आढावा घेतला, त्यानंतर महापौर बोलत होत्या.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, मार्च महिन्यापासून आलेले धार्मिक सण सर्व धर्मियांनी ज्यापद्धतीने साजरे केले त्याप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे. मुंबई महानगर पालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची तसेच फिरत्या कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून या कृत्रिम तलावांमध्ये जास्तीत जास्त विसर्जन करण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असे आवाहनही महापौरांनी गणेशभक्तांना केले आहे.
चौपाट्या ज्यांच्या घराजवळ आहेत, त्या मंडळाने तसेच गणेश भक्तांनी महापालिकेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आपली गणेश मूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावी, आपला विसर्जनाचा पाट तसेच वाळू आपल्याला त्वरित देण्यात येईल, जेणेकरून विसर्जनस्थळ आपल्याला पटकन मोकळे करता येईल, असेही महापौरांनी प्रतिपादन केले.गिरगाव चौपाटी येथे तीनशे टेबलची गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटी पासून महापौरांनी पाहणीला प्रारंभ केला. त्यानंतर दादर चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटी, मार्वे, गोराई जेट्टी, याठिकाणी महापौरांनी भेट देऊन तेथील तयारी कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. गिरगाव चौपाटी येथे ज्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याप्रमाणे इतर चौपाट्यांवरही व्यवस्था करण्याचे निर्देश महापौरांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
यानंतर उपमहापौर अँड. सुहास वाडकर यांनी पूर्व उपनगरातील पवई तलाव, भांडुपकेश्वर कुंड, मोरया उद्यान तलाव व सायन तलाव येथील गणेश विसर्जन स्थळांच्या तयारी कामांचा आढावा घेतला.
बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागाद्वारा प्रकाशित "गणेशोत्सव २०२०" या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पेडणेकर यांच्या हस्ते गिरगाव चौपाटीवर करण्यात आले. "गणेशोत्सव २०२०" ही माहिती पुस्तिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.