मुंबई - देशामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात अतिशय चिंतेच वातावरण आहे. मात्र, अशा परिस्थितीत पण काही बातम्या हृदयात वेगळी जागा तयार करतात. असेच काहीसे चित्र मुंबईत पाहायला मिळाले. येथील एक मशीद सध्या मुंबईत अडकलेल्या स्थानांतरित कामगारांना अन्न पुरवण्याचे काम करत आहे.
कोरोना आपत्ती विरोधात शासन सर्व जोमानिशी लढत आहे. नागरिक लॉकडाऊनच्या परिस्थितीत सामाजिक अंतर ठेवत आहेत. अशा परिस्थितीत काही नागरिक असेही आहेत, जे जबाबदारीने वागून कोरोनाविरुद्धचा लढा निकराने लढत आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत मुंबईसारख्या महानगरात अडकलेल्या स्थानांतरित कामगारांची अडचण वाढत आहे. सरकार उपाययोजना करत आहे. अशा परिस्थितीत समाजातून सर्व जाती, धर्माचे सर्व स्तरातले नागरिक जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात देत आहेत. मुंबईतील दादर भागातील एक मशीद सध्या मुंबईत अडकलेल्या स्थानांतरित कामगारांना अन्न पुरवण्याचे काम करत आहे. दादर हा मुंबईतील महत्वाचा परिसर असून दादर स्टेशन हे टर्मिनस आहे, इथून भारताचा प्रत्येक भागात जायला एक्स्प्रेस गाड्या सुटतात. आता लॉकडाऊनच्या परिस्थितीत येथील प्रवासाचा आणि स्थानांतरित कामगारांचा खोळंबा झाला आहे. अशा स्थितीत या मशीद कमिटीने लोकांना दोन घास अन्नाचे देऊन समाजसेवेचा नवा पायंडा पाडला आहे.