मुंबई - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढा देताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांनी पतीच्या निधनानंतर लष्करात दाखल होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लष्करी सेवा परिक्षेत त्या अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
कनिका राणे या संगणक अभियंता असून, त्यांनी लष्कर अधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. ऑक्टोबर महिन्यात चेन्नईत त्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. पतीचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी कनिका लष्करात दाखल होणार आहेत.
कनिका राणे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत, 26 जुलै या शौर्य दिनी मी लष्करात अधिकारी पदासाठी दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे आम्हाला समजले. हा एक प्रकारे मेजर कौस्तुभ राणे यांनी आशीर्वाद दिला आहे असे म्हटले.
कौस्तुभ यांच्या जाण्यानंतर मी लष्करी सेवेत जाण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने तयारी सुरू केली. स्विमिंग, योगा आणि शारीरिक व्यायाम नित्याने सुरू केले. सासू ज्योती राणे या आपल्या मुलांना सांभाळून नोकरी करत होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन माझ्या 3 वर्षाच्या मुलाची जबाबदारी आई वडिलांकडे सोपवली आणि हा धाडसी निर्णय घेतल्याचे कनिका म्हणाल्या.
शासनाने वीरपत्नींच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना लष्करी सेवेत सहभागी करून घ्यावे, त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेजर कौत्सुभ राणे यांना वीरमरण आल्यानंतर लष्करात भरती होऊन कनिका यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयाला ईटीव्ही भारतचा सलाम !