मुंबई - भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने राज्यातील मराठा समाजाची घोर फसवणूक केली असा आरोप करत, सोमवारी मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहार या संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा... ...मग महाराष्ट्राच्या करदात्यांचा पैसा नेमका कुठे खर्च केला जातो? - कॉ. विश्वास उटगी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मराठा समाजावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून फडणवीस सरकारला सळो कि पळो करून सोडणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने यावेळी सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा दावा करत मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहार संघटनेच्या नेत्यांनी मुंबईत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्यातील संपूर्ण मराठा समाज आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही या दोन्ही संघटनांच्या नेत्यांकडून देण्यात आली.
![Maratha Kranti Morcha and Shiv Prahar Leaders join NCP party](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4686130_b.jpg)
हेही वाचा... भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे मीडियावर निर्बंध, अनिल गोटेंची सणसणीत टीका
मंगळवारी पारनेर येथे शरद पवारांच्या उपस्थितीत संजीव भोर-पाटील करणार पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील जिल्हा, तालुका स्तरावरील प्रमुख नेत्यांनी प्रवेश केला. त्यासोबतच शिव प्रहार या संघटनेच्या प्रमुखांनी पक्षात प्रवेश केला आहे. मंगळवारी पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख संजीव भोर-पाटील यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. या प्रवेशाच्या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.