मुंबई - मान्सूनची प्रतिक्षा आता संपली असून आज (गुरुवार) मान्सून दक्षिण कोकणातून राज्यात दाखल झाला आहे. येत्या ४८ तासात मान्सून पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे, अशी माहिती मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
केरळात दाखल झाल्यानंतर मान्सून कर्नाटक आणि पुढे गोवामार्गे महाराष्ट्र असा प्रवास करत पुढे सरकतो. पुढील २ दिवसात मान्सून महाराष्ट्रात आणखी पुढे सरकेल, असेही होसळीकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'कोरोना महामारीला संधीमध्ये बदलून देशाला आत्मनिर्भर बनवूया'
मान्सूनची रेषा अरबी समुदात 28 डिग्री उत्तर, त्यानंतर हर्णे, रत्नागिरी हा भाग करून दक्षिण मध्य महाराष्ट्रमधील सोलापूर, नामगुडम आणि पुढे जगदलपूर, गोपाळपूर अशी मान्सूनची रेषा आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र येथे मान्सून दाखल झाला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या नोंदी आहेत. मान्सूनचा प्रवास उत्तरेकडे होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे, असे होसाळीकर म्हणाले. बंगालच्या खाडीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाने मान्सून चांगली प्रगती करत आहे.