अमरावती - रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यात अनेक सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळात अनेक वर्षापासून बंगाली पॅटर्नच्या दुर्गा देवीच्या मूर्ती स्थापन करण्याची परंपरा आहे. कलकत्ता येथील मंडल कुटुंब 45 वर्षांपासून बंगाली पॅटर्नच्या दुर्गा देवीची मूर्ती अमरावतीत येऊन घडवत आहे. यावर्षी सुद्धा मंडल कुटुंबीयांनी घडविलेल्या सुरेख मूर्ती जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळात स्थापन केल्या जाणार आहेत.
श्री अंबादेवी आणि एकवीरा देवी यांचे स्थान असणाऱ्या अमरावती शहर आणि जिल्ह्यात नवरात्री उत्सव मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो. नवरात्री उत्सवाच्या पर्वावर गेल्या 45 वर्षापासून पश्चिम बंगालमधील गुरुपद मंडल शहरात सक्कसात परिसरात असणाऱ्या श्री बालाजी मंदिर परिसरात दुर्गा देवीची बंगाली स्वरूपातील मूर्ती घडवतात. 5 वर्षांपासून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गुरुपद मंडल अमरावतीत येऊ शकत नसले तरी त्यांच्या कुटुंबाची परंपरा त्यांचा मुलगा सुदीप मंडल कायम ठेवून आहे. या वर्षी सुदीप मंडल आपल्या कुटुंबासह महिनाभरापासून बालाजी मंदिर संस्थान परिसरात सुंदर, सुरेख अशा बंगाली पद्धतीच्या दुर्गादेवीच्या मूर्तीला आकार देत आहेत.
ईटीव्ही भारत'शी बोलताना सुदीप मंडल यांनी आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता पूर्णतः माती गवत आणि बांबूंचा उपयोग करून देवीची मूर्ती घडवितो असे सांगितले. मंडले यांनी घडविलेल्या दुर्गादेवीच्या मूर्तींना अमरावती शहरासह धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, अचलपूर, मोर्शी, चांदूर बाजार तालुक्यातील महत्त्वाच्या सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची मागणी असते. पाहिल्याबरोबर डोळ्यात भरणाऱ्या मंडल यांनी साकारलेल्या दुर्गा देवीची मूर्ती हे आता जिल्हाभर प्रसिद्ध झाली आहे. 45 वर्षापूर्वी कोलाता येथून खास मूर्ती घडविण्यासाठी मंडल कुटुंब अमरावतीत यायला लागले.
आता हे कुटुंब मध्यप्रदेशातील बैतुल शहरात गेल्या पाच वर्षापासून स्थायिक झाले आहेत. कुटुंबाचे प्रमुख गुरुपद मंडल यांच्यासोबत सुमारे पंचवीस वर्षापासून येणारे त्यांचे पुत्र सुदीप मंडल आता अमरावती शहर आणि जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बंगाली स्वरूपाच्या मूर्ती घडविण्याची परंपरा कायम राखून आहेत.