मुंबई - मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार आटोक्यात असताना पावसाळी आजार आणि साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली होती. आता नोव्हेंबरच्या २१ दिवसात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो चिकनगुनिया या आजारांची रुग्णसंख्या तिप्पट वाढल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
विविध आजारांच्या रुग्णसंख्येत तिप्पटीने वाढ -
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत साथीचे आजार आटोक्यात आल्याचे समोर आले होते. यामध्ये मलेरियाचे ७२ रुग्ण, लेप्टोचा १, डेंग्युचे ४७, गॅस्ट्रोचे ४९, हिपेटायटिसचे ६, चिकनगुनियाचे ६ आणि ‘एच१एन१’चा १ रुग्ण आढळला होता. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मलेरियाचे ८०, डेंग्यू २३, गॅस्ट्रो ७२, चिकनगुनिया ७ आणि लेप्टोचे ४ रुग्ण आढळले होते. आता १ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या २१ दिवसात मलेरियाचे २३४, डेंग्यूचे ९१, गॅस्ट्रोचे २००, चिकनगुनीयाचे १२ तर लेप्टोचे ६ रुग्ण आढळले आहेत. या २१ दिवसात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो चिकनगुनिया या आजारांची रुग्णसंख्या तिप्पट वाढली आहे.
काळजी घ्या -
गेल्या दीड वर्षोपासून मुंबईकर कोरोनाविरोधात लढा देत आहेत. मुंबईकर नागरिकांची साथ आणि योग्य उपचार पद्धती यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखण्यात पालिकेला यश आले आहे. परंतु पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांमुळे मुंबईकरांपुढे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी. तसेच मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
१ ते २१ नोव्हेंबरपर्यंत रुग्णांची स्थिती -
मलेरिया - २३४
डेंग्यू - ९१
गॅस्ट्रो - २००
कावीळ - २४
चिकनगुनीया - १२
लेप्टो - ६
स्वाईन फ्ल्यू - १