मुंबई - हल्ली सोशल मीडियावर अनेकजण हातात शस्त्र घेऊन भाईगिरीचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करत समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत असतात. असे व्हिडिओ तयार करणाऱ्याच्या मुसक्या देखील पोलीस आवळतात. असा प्रकारचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुलुंड मधील अल्पवयीन मुलांना महागात पडले आहे. एका पिस्तूल मधून गोळी घालत असल्याचं नाट्य रूपांतरित व्हिडिओ वायरल झाला होता. मात्र यात वापरण्यात आलेली खरी आहे की खोटी आहे याबाबत शंका असल्याने पोलिसांनी या मुलांना शोधून काढले व त्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ न करण्याची ताकीद देऊन सोडण्यात आलेले आहे.
गेल्या काही दिवसापासून रिल्स व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण वाढलेले आहे. काही व्हिडिओतून गुंडागिरी चे समर्थन करण्यात येते असे अनेक व्हिडिओ दिवसेंदिवस वायरल होत असतात. पुण्यामध्ये अनेकदा बंदूक तलवार नाचणारे व्हिडिओ वायरल होत असतात. मात्र आता हा ट्रेंड मुंबईमध्ये देखील सुरू झाल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. मुलुंडमधील या अल्पवयीन तरुणांचा मारामारी व त्यातून झालेल्या भांडणात एकास पिस्तूलमधून गोळी घालत असल्याचा नाट्य रूपांतरित व्हिडीओ 'इन्स्ट्राग्राम' द्वारे व्हायरल झाला होता. या व्हिडीओ मधील प्रसंगात दाखवलेले पिस्टोल यामुळे त्याचे खरे/खोटेपणाबाबत शंका निर्माण झाली होती. समाजावर या वाईट परिणाम होण्याची शक्यता होती. या विडिओमधील असलेली जागा मुलुंड टाटा स्मशानभूमी रोड असलेचे दिसून आले होते. त्यानुसार मुलुंड नवघर पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून त्यांची ओळख पटवून सापळा कारवाईचे करत या मुलांना ताब्यात घेतले.
व्हिडिओ बनवताना वापरलेले पिस्तुल खेळण्यातील प्लास्टिकचे असलेचे निष्पन्न झाले. सदर मुले ही अल्पवयीन असून मुलुंड पश्चिम व पूर्वेकडील झोपडपट्टी भागातील आहेत. चौकशीअंती त्यांचा वरील व्हिडीओ बनवण्यामागचा उद्देश 'मनोरंजन' असल्याचा दिसून आला.तसेच त्यांना यातील दुष्परिणामाची जाणीव नसलेचे निदर्शनास आले, त्यांचे पालकांना संपर्क करून समुपदेशन करून व समज देऊन सोडण्यात आले असल्याचे नवघर पोलिसांनी सांगितले.