मुंबई - बाबरी पतानाच्या वेळेस साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वय केवळ 4 वर्षे होते. मग त्यांनी बाबरीचा ढाचा पाडला कसा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व ज्येष्ठ वकील मजीद मेमन यांनी केला. बाबरी पाडण्यात आपला सहभाग होता, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मेमन यांनी त्यांचे वक्तव्य ही दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
लोकांची सहानुभूती घेऊन मते मिळविण्याचा प्रयत्न असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मजीद मेमन यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर टीका केली. साध्वी प्रज्ञा सिंह यांना २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटसंदर्भात अटक झाली होती. नोव्हेंबर २००८ च्या दरम्यान एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कोठडीत लैंगिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप साध्वीने केला होता. मात्र साध्वी प्रज्ञा यांच्या वैद्यकीय चाचणीतही अशी कोणतीही बाब समोर आली नव्हती, असे मेमन म्हणाले.
२०१४ मध्ये केंद्रीय मानवाधिकार आयोगाने यासंदर्भात चौकशी समितीची नेमणूक केली होती. त्यानुसार डीआयजी आर.एस. खैरे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला होता. ज्यात तुरुंग प्रशासन, इतर कैदी आणि ज्या रुग्णालयामध्ये साध्वीला दाखल करण्यात आले होते. तिथे केलेली चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारावर या आरोपांत तथ्य नसल्याचे या समितीने म्हटले होते. त्यामुळे कुठेही साध्वीचे आरोप सिद्ध होत नसल्याचे मजीद मेमन यांनी म्हटले आहे.
दरम्यान शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याची निंदा देशातील ८ निवृत्त माजी पोलीस महासंचालकांनी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये ज्युलियो रिबेरो, प्रकाश सिंग, पि के एच थराकन, कमल कुमार, जेकब पुनोसी, संजीव दयाळ, जयंतो चौधरी, एन रामचंद्रन या माजी पोलीस महासंचालकांचा समावेश आहे.
साध्वी यांच्यापाठीमागे शाह व मोदी हे उभे आहेत. हे दु:खदायक असल्याचेही मेमन यावेळी म्हणाले.