मुंबई - राज्यसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री ( Home Minister ) दिलीप वळसे पाटील ( Dilip Valse Patil ) यांनी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जाऊन भेट घेतली. या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.
सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ - माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या जिवाला पवार कुटुंबीयांकडून धोका असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. मात्र, सदाभाऊ खोत यांच्या जिवाला काही धोका असू शकतो, असे आपल्याला वाटत नाही, असे गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सदाभाऊ खोत सांगोल्यात दौऱ्यावर असताना तेथील एका हॉटेल व्यवसायिकांनी त्यांची 66 हजार रुपयाची उधारी 2014 सालापासून दिली नसल्याचा आरोप थेट सार्वजनिक ठिकाणी केला. यानंतर सदाभाऊ खोत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. तसेच पवार कुटुंबियांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनावधानाने कार घुसली - मुख्यमंत्र्यांचा ताफा काल (17 जून) मलबार हिल परिसरातून जात असताना ताफ्यामध्ये एक कार घुसली होती. मात्र, ही कार अवधाने ताफ्यामध्ये घुसली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ही कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा मागे कोणताही षडयंत्र नव्हते. मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथून जात असताना ही कार अवधाने घुसली. मात्र, याबाबतची सर्व चौकशी पोलिसांकडून करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मात्र, पोलिस बंदोबस्तात काही कमतरता राहिली का? याचा आढावा घेतला जाईल, असे देखील गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.