मुंबई - अनेक वर्षांपासून वादात असणाऱ्या राम मंदिराचे निर्माण कार्याला आज अखेर मुहूर्त मिळाला आहे. अयोध्येत आज रामजन्मभूमीवर मंदिर निर्माणाचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे. याचं पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयात देखील आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या आनंदोत्सवात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
राम मंदिर जन्मभूमी भूमिपूजनाचा निमित्त भाजप महाराष्ट्र कार्यालयात रोषणाई करण्यात आलेली आहे. कार्यालयाची विद्यूत रोषणाई आणि फुलांची आरास करून सजावट करण्यात आली आहे.
तसेच आज दिवसभर भाजप कार्यालयात भजन समारंभ असणार आहे. रॅम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त भाजप कार्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
आज भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याला सर्वांनाच उपस्थित राहणे शक्य होणार नाही. तसेच त्यामुळे अयोध्यातून होणाऱ्या भूमिपूजनाचा लाइव्ह प्रक्षेपण पाहण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. तो कार्यक्रम पहातच भाजप पदाधिकारी कार्यालयातूनच राम जन्मभूमी भूमिपूजनाचा आनंद घेणार आहेत.
भाजप महाराष्ट्र नेते राम जन्मभूमीसाठी आपण कशाप्रकारे लढलो आणि हा उत्साह आपल्यासाठी काय आहे, याबद्दल यावेळी पदाधिकाऱ्यांची संवाद साधून माहिती देणार आहेत.