मुंबई - कोविड काळात राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोरोना काळात गरजुंना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत होती. त्यामुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला होता. 30 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकाराने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.
कोरोनाचे संक्रमण कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने मोफत शिवभोजन थाळी बंद करून पूर्वीप्रमाणे दहा रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पार्सल सुविधा बंद केली जाणार असून 1 ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे.
हे ही वाचा -अहमदनगर : शिकवणीच्या नावे विद्यार्थिनींना बोलवायचा अन् करायचा अश्लील चाळे
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या टाळेबंदीत गरीब व गरजू लोकांना जेवणाअभावी हालअपेष्ठा सहन कराव्या लागू नयेत, म्हणून राज्य सरकारने १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने या योजनेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. कोरोनाच्या काळात या योजनेचा लाखो गरजूंना लाभ मिळाला. या योजनेचा गरीब व गरजू लोकांना मोठा आधार मिळाला होता. मात्र सध्या राज्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने राज्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथील केले आहेत. त्यामुळे शिवभोजन थाळीचा दर पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे १० रूपयाला मिळणार आहे. शिवाय यापूर्वी सुरू असणारी पार्सल सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा -सक्षम कारखाने अवमूल्यन करुन घशात घालणे ही पवार परिवाराची मोडस - किरीट सोमैया
राज्यात 950 शिवभोजन केंद्र होती सुरू -
राज्यात ब्रेक द चेन अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केलं होतं. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण 950 केंद्र सुरू होती.
शिवभोजन थाळीचे स्वरुप -
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर शिवभोजन थाळीचा लाभ दिला जातो. या थाळीत ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण नागरिकांना देण्यात येत आहे.
एप्रिलपासून मिळत होती मोफत थाळी -
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. शिवभोजन थाळीची सुरुवातीची किंमत १० रुपये ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोना काळात दर कमी करून ही थाळी पाच रुपयांना देण्यात आली. तर आता गत एप्रिल २०२१ पासून शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत होती. कोरोना काळात राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्वच शिवभोजन केंद्रावर थाळ्यांची संख्या वाढविण्यात आली होती.