मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या २१० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होईल, या प्रतीक्षेत असताना शिंदे - फडणवीस सरकारचा ( Shinde Fadnavis Govt ) मात्र निर्णय अधांतरीच आहे. येत्या १५ ऑगस्टला हा टप्पा सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. एमएसआरडीसीला अद्याप कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे समृद्धी महामार्ग ( Maharashtra Samruddhi Mahamarg ) राज्य सरकार खुला कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्पनेतील हा प्रकल्प आहे. सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग असून एकूण सहा मार्गिका आहेत. सुमारे ५५ हजार कोटी रुपये यासाठी खर्च केला जाणार आहे. १० जिल्ह्यातून, २६ तालुके आणि ३९२ गावातून जाणारा हा महामार्गावर २४ ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. या मार्गामुळे हे अंतर अवघ्या सात तासात पार करता येईल. व्यवसाय, उद्योग आणि व्यापाराला यामुळे चालना मिळणार आहे. सध्या शिर्डी ते नागपूर हा २१० किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा महामार्ग खुला करण्याच्या वारंवार तारखा सांगण्यात आल्या. लवकरच हा महामार्ग खुला करुन नागपूरकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. अद्याप हा मार्ग खुला झालेला नाही.
१५ ऑगस्टचा मुहूर्त : समृद्धी महामार्ग खुला करण्यासाठी आता १५ ऑगस्टचा मुहूर्त देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी घोषणा केली आहे. मात्र, एमएसआरडीसीला अद्याप यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. सध्या २१० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम पूर्ण आहे. सरकारच्या सूचना आल्यास महामार्ग खुला करण्याची तयारी करू, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने दिली.
प्राण्यांसाठी वैशिष्ट्य : समृद्धी महामार्गाचा काही भाग अरण्यातून जातो आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या रक्षणासाठी आठ ओव्हरपास आणि ७६ ठिकाणी जमीनीखालून मार्ग ठेवले आहेत. वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी नॉईस बेरियर्स देखील बसवण्यात येणार आहेत. वन्यजीवांना ओव्हर पासवरून ये - जा करताना जंगल असल्याचा भास व्हावा, याकरीता खास झाडे लावली आहेत.