मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदार आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रतोद सुनील प्रभू यांनी केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. शुक्रवारी (दि.ल 25 जून) दुपारी विधिमंडळात सुरू झालेली बैठक तब्बल सहा तास चालली. या बैठकीनंतर 16 सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी बुधवारी सेनेच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला बंडखोर सदस्य अनुपस्थित राहिले. त्याप्रकरणी पक्षशिस्त मोडल्याबद्दल त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका सेनेचे नवे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे केली होती.
त्याप्रकरणी शुक्रवारी विधिमंडळात शिवसेनेचे सुभाष देसाई, अनिल देसाई, अंबादास दानवे, अजय चौधरी, अरविंद सावंत आदी नेते ठाण मांडून होते. मात्र, विधानसभा उपाध्यक्ष यांचा निर्णय होत नव्हता. शेवटी रात्री 9 वाजता राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा बंडखोर 16 सदस्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया करण्याचे ठरले.
दरम्यान, या 16 बंडखोरांना आपले म्हणणे विधानसभा उपाध्यक्ष यांच्यासमोर मांडावे लागणार आहे. बंडखोर सध्या गुवाहाटीत आहेत. या 16 आमदारांना त्यांचे म्हणणे 48 तासांत मांडण्याची सूचना केली आहे. त्यानंतर योग्य ती उपाध्यक्ष कारवाई करतील, असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सांगितले.
हकालपट्टी झाल्यानंतरही आपणच गटनेता असल्याचा दावा - आमदार अजय चौधरी यांची राज्य विधानसभेतील शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी मंजुरी दिली. यासंदर्भातील पत्र उपसभापती कार्यालयाकडून शिवसेनेच्या कार्यालयीन चिटणीसांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना झटका बसला आहे. कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी झाल्यानंतरही आपणच गटनेता असल्याचा दावा केला होता. त्यावर नरहरी झिरवाळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ही आहेत आमदारांची नावे - एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, अब्दूल सत्तार, महेश शिंदे, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, बालाजी कल्याणकर, चिमनराव पाटील, अनिल बाबर, रमेश खैरनारे, बालाजी किनीकर, संदिपान भुमरे, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय रायमुलकर, या आमदारांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेने मागणी केली आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांचा गट नरहरी झिरवाळांविरोधात दाखल करणार अविश्वास ठराव