मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्यामागे षडयंत्र करण्यात ( Aaditya Thackeray Criticized Shivsena Rebel Mla ) आलं. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री आमदारांना परत येण्याचा आवाहन करत आहेत. या आमदारांना तेथे सुरक्षेत ठेवण्यात आलाय. पण, सुरक्षा भेदून त्या आमदारांना यायचं असेल तर त्यांनी यावे, असे आवाहनं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. मंगळवारी ( 28 जून ) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांना दगा दिला गेला. महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना हा दगा देण्यात आला. तसेच, वांद्रे पूर्व येथे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचे पुनर्वसन आणि औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरणाच्या प्रस्तावाबाबत आज ( 29 जून ) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार की नाही, याबाबत आता आपण सांगू शकत नसल्याचं, आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.
पॉलिटिकल सर्कस थांबली पाहिजे - शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. ईडीकडून असे वारंवार समन्स विरोधी पक्षाच्या नेत्यांना बजावले जात असल्याने, देशात लोकशाही उरली आहे का नाही?, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे पॉलिटिकल सर्कस थांबवावी, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.