मुंबई - कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी राज्यभर कलम 144 लागू करण्यात आले आहे. संक्रमणाचा प्रसार होऊ नये, यासाठी लोकांनी घरीच थांबण्याचे आवाहनही करण्यात आलंय. यासाठी संचारबंदीचाही मार्ग सरकारने अवलंबला आहे. मात्र ही संचारबंदी तोडून रस्त्यावर जाणारे आणि इतर मार्गाने कायद्याचे उल्लंघन करणारेही लोक आहेत. अशा लोकांवर 22 मार्च ते 10 एप्रिल या काळामध्ये संपूर्ण राज्यात एकूण 34010 गुन्हे नोंदविण्यात आले असून क्वारंटाईनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 468 जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 69 घटना घडल्या असून या गुन्ह्यात 169 आरोपीना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोविड 19च्या संदर्भात 60727 फोन कॉल 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले होते. त्यानुसार अनधिकृत वाहतुकीचे 777 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत वाहतूक प्रकरणी 2510 जणांना अटक करण्यात आली आहे. तर तब्बल 18995 वाहन जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 1 कोटी 21 लाख 99 हजारांचा दंड थोटावला आहे.
राज्यात कलम 144 व 188 च्या अंतर्गत पुणे शहरातून सर्वाधिक 4317 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 2690, नागपूर 2299, नाशिक शहर 2227, सोलापूर 2994 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सर्वाधिक कमी 46 गुन्हे अकोला येथे नोंदविण्यात आले आहेत. या काळात राज्यभरात वेगवेगळ्या शहरात फॉरेनर कायद्याच्या अंतर्गत 136 परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्यात आली असून मुंबईत 32, अहमद नगर 29, अमरावती 18, पुणे शहर 8, नागपूर शहर 8, ठाणे 21, चंद्रपूर 11, गडचिरोली 9, नवी मुंबई 10, तर नांदेड मधून 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.