मुंबई - शहरात एका इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्य करतात. कोरोनाबाधित एक रुग्ण सापडला की, तो राहत असलेली इमारत त्यांच्या आजूबाजूच्या इमारती सील केल्या जातात. या परिसरात साहणाऱ्या इतर कुटुंबाना बाहेर पडता येत नाही. अशा कुटुंबाना मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्यामार्फत धान्य पोहचवण्यात आले.
या इमारतीत किंवा वाड्यांमध्ये राहणाऱ्या इतर कुटुंबांची संख्या फार मोठी आहे. त्यांना घराबाहेर पडता येत नाही. अशावेळी घरात असलेले अन्नधान्य संपत आलेले असते. एकतर आजाराची भीती त्यात जीवनावश्यक वस्तू मिळतील किंवा नाही याची चिंता या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावत आहेत.
मुंबईमधील प्रभादेवी, दादर, माहीम येथील ज्या इमारती प्रशासनाने सीलबंद केल्या आहेत. त्यांच्या घरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या मार्फत अन्नधान्य पोहचवण्यात आले. जवळ जवळ १० ते १२ हजार किलोचे अन्नधान्य (गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ,साखर, चहा पावडर व तेल) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचले. प्रभादेवी, दादर, माहीममधील गरजू लोकांपर्यंत धान्य पोहोचवू शकलो, याचे समाधान आहे, असे मत नितीन सरदेसाई यांनी याप्रसंगी वक्तव्य केले.