मुंबई - वीज दरात प्रति युनिट २ रुपये सवलत लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील ५० हजार औद्योगिक ग्राहकांची निवेदने येत्या १५ दिवसात राज्याचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठविण्यात येतील, असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी जाहीर केले आहे.
सप्टेंबर २०१८ पासून राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलामध्ये १५ ते २५ टक्क्याने वाढ झाली होती. ही औद्योगिक वीज दरवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक संघटनांच्या सहभागाने १२ फेब्रुवारीला राज्यातील २० ठिकाणी मोर्चे व वीज बिलांची होळी करण्याचे आंदोलन केले. परंतू, राज्य सरकारकडून आश्वासनाव्यतिरिक्त अद्याप काहीच पदरात पडले नसल्याने उद्योग क्षेत्रात असंतोष आहे. आर्थिक आव्हानांचा सामना करण्यात अपयश येत असल्याने राज्य सरकारने विदर्भ, मराठवाडा तसेच वस्त्रोद्योग वगळता राज्यातील अन्य सर्व उद्योगांच्या वीजदरात कपात करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
राज्यातील वीज दर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहेत. यामुळे आर्थिक बोजा वाढला असून, उद्योगांना राष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वीजदर कमी करण्यात यावे, असे आवाहन या संघटनांनी केले.
ऑगस्ट २०१४ मध्ये व्हिजन डॉक्युमेंटद्वारे फडणवीस यांनी भाजपची सत्ता आल्यानंतर वीज गळती थांबवून त्याचा खरेदी खर्च कमी करण्यात येईल, असे सांगितले होते. तसेच वीज दर कमी करण्याचे जाहीर आश्वासनही दिले होते. त्यानुसार शासनाने आश्वासनांची पूर्तता करावी. सप्टेंबर २०१८ पासून पुढील कालावधीसाठी २ रुपये प्रति युनिट सवलत द्यावी, अशी सर्व औद्योगिक संघटनांची मागणी आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्वरीत निर्णय घ्यावा, असे जाहीर आवाहन समन्वय समिती, महाराष्ट्र चेंबर व सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.