मुंबई - कोरोना संकट ओसरल्यानंतर राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाला. मात्र, येत्या १० जूनला राज्यसभा आणि २० जूनला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका होणार असल्याने राज्य सरकार अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मताधिक्य राखण्यासाठी येत्या ३० जूनपर्यंत सर्वच शासकीय-निमशासकीय बदल्यांना खो दिला आहे. मात्र, मविआ सरकारला विधानसभेची धास्ती वाटू लागल्याने बदल्या थांबवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
३० जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती, सरकारने काढले परिपत्रक - ३१ मेपर्यंत शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वेग येतो. इच्छितस्थळी बदली मिळावी, यासाठी अनेकजण मंत्रालयात खेटे घालतात. मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे बदल्या करता आल्या नव्हत्या. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊन जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा बदल्यांना सुरुवात झाली होती. मात्र राज्य सरकारने नवे परिपत्रक काढत ३० जूनपर्यंत नियमित बदल्याही करू नयेत, असे आदेश दिले आहेत. बदल्यांच्या प्रतिक्षेत असणा-यांचा यामुळे हिरमोड झाला आहे. प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.