मुंबई - कोरोना काळात नोकरदार वर्ग, विद्यार्थी, सर्व सामान्य जनतेवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गंभीर स्वरुपाचे गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मात्र, गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला नसल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ( Lockdown Cases Withrdraw Aslam Shaikh ) दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बैलगाडा शर्यतीतील गुन्हे मागे - अस्लम शेख म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात अनेक सर्व सामान्य नागरिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थ्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज्य सरकारने या सर्वांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज ( गुरुवार ) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. मोठे व गंभीर स्वरुपाचे गुन्हे वगळता सर्व गुन्हे मागे घेण्याबाबत एकमत झाले आहे. अधिकृत निर्णय जाहीर केला नाही. केवळ आज चर्चा झाली. मात्र, बैलगाडा शर्यतीत मालकांवरील गुन्हे मागे घेतले आहे. यावेळी आर्थिक नुकसान केलेल्यांसाठी अटी शर्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना पूर्ण अटोक्यात - रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. रुग्ण संख्या जेव्हा वाढत होती, त्यावेळी भाजपाकडून धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली जात होती. रस्त्यावर आंदोलन केली. सरकारने भाजपाच्या राजकारणाला बळी न पडता, लोकांच्या आरोग्याचा विचार करत निर्बंध कायम ठेवले. त्यामुळे कोरोना आज पूर्णतः आटोक्यात आल्याची माहिती शेख यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सक्षम - तलवार दाखवल्याप्रकरणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत विचारले असता शेख यांनी म्हटलं की, जे चूकीचे आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. नेहमी न्यायाच्या बाजूने मुख्यमंत्री असतात. सरकारमध्ये मी नाराज नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत. ते प्रत्येकाला योग्य न्याय देतात, असेही पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत.