मुंबई - डोंगरी भागातील केसरबाई ही इमारत कोसळून त्यामध्ये ४० ते ५० लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत ११ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर, ८ जखमी आहेत. जखमींना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री विखे-पाटील आणि महापौरांनी जखमींची भेट घेतली.
"दुर्घटना घडली ती इमारत धोकादायक होती त्यावर महापालिकेने नोटीस देऊन कारवाई करायला हवी होती. मात्र, रहिवाशांचा हलगर्जीपणा व अंतर्गत वादामुळे इमारत खाली करता आली नाही. दोन्ही बाजू लक्षात घेणे गरजेचे आहे. सध्या जखमींवर उपचार केले जात आहेत." असे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "जखमींवर योग्य उपचार केले जात असून महापालिका आणि एनडीआरएफची टीम इमारतीचा मलबा बाजूला करण्याचे काम करत आहे."
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे देखील जखमींना भेटण्यासाठी आले होते मात्र, त्यांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला. महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. योग्य माहिती येताच यावर बोलू असे यावेळी महापौरांनी सांगितले.