मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी दिली आहे. याशिवाय शिवरायांचा इतिहास पुसण्याचे यांचं धाडसच कसं झालं? असा संतप्त सवालही संभाजीराजेंनी केला आहे.
संभाजी राजे म्हणाले, मी 'केंद्रीय शिक्षण मंडळाकडून' शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जावा म्हणून प्रयत्न करत आहे. अनेकदा केंद्रीय शालेय शिक्षण मंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जर कोणी चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
देशभर महाराजांचं कर्तृत्व पोहोचावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रीयांची व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असताना, महाराष्ट्रातच उलटी गंगा वाहावी? ही आगळीक अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.