मुंबई - राज्यात आतापर्यंत १३ लाख १६ हजार ७६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र आज १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आता पर्यंत एकूण ४० हजार ८५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचल्याचे टोपे यांनी सांगितले. आजही सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली आहे. तर, दिवसभरात १० हजार ५५२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. १९ हजार ५१७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७१ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. त्याचा आकडा १ लाख ९६ हजार २८८ आहे, असे ते म्हणाले.
आजपर्यंत घेण्यात आलेल्या ७८ लाख ३८ हजार ३१८ नमुन्यांपैकी १५,५४,३८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.८४ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ८० हजार ९५७ लोक होम क्वारंटाइन आहेत. सध्या २३ हजार १७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.