मुंबई - जग, देश आणि राज्य कोरोनाच्या संकटात असताना राज्यात वाघांच्या संख्येत यंदाही चांगली वाढ झाल्याचं व्याघ्रगणनेतून पुढे आलंय. 2014 साली राज्यात 190 वाघ होते. ते वाढून आता 312 झाले आहेत. ही वाढ जवळपास 65% आहे. देशातील एकूण वाघांची संख्या 2 हजार 967 झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात वाघांचे मानवावर हल्ले वाढले असले तरीही स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. त्यातूनच जागतिक व्याघ्र दिन महाराष्ट्राची मान उंचावत असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे.
भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. देशात मध्यप्रदेश राज्यात वाघांची संख्या 308 वरून 526 इतकी झाली आहे. हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या 406 वरून 524 इतकी झाली आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या 340 वरुन 442 इतकी झाली आहे.
महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या 190 वरुन 312 इतकी झाली आहे. पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या 229 वरून 264 झाली आहे.
महाराष्ट्रात 6 व्याघ्रप्रकल्प
महाराष्ट्रात सहा व्याघ्रप्रकल्प राबवले जात आहेत. बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिलंय. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा याउद्देशानेठी योजना’ राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवताना मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. यामध्ये स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतांना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.
महाभारतातील उद्योगपर्वातील हा श्लोक आहे. या श्लोकाच्या आधारे महात्मा विदुर हे महाराज धृतराष्ट्र याना वनांचे आणि वाघांचे परस्परांवरील अवलंबित्व सांगत आहेत. यात ते म्हणतात की वाघांशिवाय वनांचे अस्तित्व संभव नाही, तसेच वाघांशिवाय वने जिवंत राहू शकत नाहीत. जंगलांचे रक्षण वाघ करतो. त्याबदल्यात जंगले वाघांचे संरक्षण करत असतात. आधुनिकीकरण आणि विकासाच्या रेट्यात दिवसेंदिवस जंगलांची जागा विविध विकास कामांनी आणि सिमेंट-काँक्रीटच्या इमारतींनी घेतली. जंगलांचा ऱ्हास झाल्याने वाघांचा अधिवास नष्ट झाला आणि पर्यायाने वाघांची संख्या देखील कमी झाली.
मेळघाट राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लाखाच्या आसपास असणारी वाघांची संख्या सत्तरच्या दशकात हजारांच्या घरात आली होती. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने देशात वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी 1973-74 मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत देशात सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले. मेळघाट हा त्यापैकी सुरू होणारा राज्यातला पहिला व्याघ्र प्रकल्प होता. सध्या देशात 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी सर्वाधिक 6 व्याघ्र प्रकल्प हे आपल्या राज्यात येतात हे विशेष.
व्याघ्र प्रकल्पातील योग्य व्यवस्थापन आणि संरक्षणाच्या जोरावर आपण वाघांची संख्या वाढवण्याच्या दिशेने यशस्वी पाऊले टाकत आहोत. 2006 मध्ये भारतात केवळ 1 हजार 411 वाघ उरले होते. पुढील तीन वर्षांत वनविभागाने चंद्रपूर लँडस्केपमधून 160 वाघांच्या साठ्यासह 50 वाघांच्या स्थलांतराची योजना केली.
'कमी संख्येने प्राणीशास्त्रविषयक उद्याने किंवा वाघांची संख्या असलेल्या इतर राज्यात 50 वाघांची शांतता आणि हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला पाठवला आहे', असे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले. हा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळ, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना होते.
भारतातील वाघांची संख्या
2006 साली वाघांची संख्या 1411 होती.
2010 साली संख्या 1706 होती
2014 साली संख्या 2226 होती.
2019 साली संख्या 2967 झाली आहे.
महाराष्ट्रातील वाघांची स्थिती
2006 साली वाघांची संख्या 103 होती.
2010 मध्ये वाघांची संख्या 168 झाली.
2014 मध्ये वाघांची संख्या 190 झाली.
2019 मध्ये ही संख्या 312 झाली आहे.