मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी पार पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील सध्याच्या स्थितीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी नंतर सांगितले.
आमची भूमिका आम्ही मांडली - थोरात
काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आणि आम्ही एकत्र बसलो होतो. आमची भूमिका होती ती आम्ही या बैठकीत मांडलेली आहे. एकत्र बसून सध्याच्या स्थिती बद्दल आम्ही चर्चा केली असे बाळासाहेब थोरात यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात दिल्ली हायकमांडने अहवाल मागविला आहे. या अहवालावर चर्चेसाठीच ही बैठक बोलाविण्यात आली होती.
परमबीर प्रकरणावरून बैठक
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचा दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे मत आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांडने या सर्व घटनेवर राज्यातील काँग्रेस मंत्र्यांकडून अहवाल मागविला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांनी हा अहवाल तयार केला असून यावर चर्चेसाठीच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. हा अहवाल नंतर दिल्ली हायकमांडला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.
या प्रकरणावरून सध्या मुंबई ते दिल्लीपर्यंत बैठकीचे सत्र सुरू आहे. काँग्रेस हायकमांडचे या प्रकरणावर बारकाईने लक्ष आहे. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल देण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्राकडे देशाचे लक्ष
परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून विरोधी भाजपकडून राज्य सरकारला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. या मुद्द्यावरून संसदेतही चांगलाच गदारोळ सोमवारी बघायला मिळाला. राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काही खासदारांनी संसदेत केली. त्यामुळे संपूर्ण देशाचे राज्यातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
शरद पवारांकडून पाठराखण
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे. पत्रातील आरोपांत तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर विरोधक मात्र देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे विरोधकांचा वाढता दबाव पाहता मुख्यमंत्री आता अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का याचीच चर्चा होताना दिसत आहे.
हेही वाचा - शरद पवारांचा अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा डाव फसला - देवेंद्र फडणवीस