मुंबई - सरकारला उपरती झाली आणि आता कृषी कायदे (Farmers Law) मागे घेण्याची घोषणा केली. सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. तसेच कोणतेही कायदे करताना विरोधकांसह जनतेला विश्वासात घ्यायला हवे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला आहे.
वीर आंदोलकांना अभिवादन
शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचे वातावरण होते. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझे त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना नम्र अभिवादन करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.
'तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर करावी'
आता सरकारला उपरती झाली आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने केली. त्याचे प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीने या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. मंत्रीमंडळात, विधिमंडळातदेखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे नामुष्की ओढवणार नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला. तसेच हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल, अशी माझी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.