मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवारी) ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येईल. दरवर्षी साधारणतः जूनमध्येच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो. यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिकांच्या तपासणीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून १७ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनामुळे या परीक्षेचा निकाल रखडला होता. मात्र, मंगळवारी मंडळाकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल...
www.maharesult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना सर्व विषय निहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होणार असून त्यासाठीची प्रत प्रिंट आउटच्या माध्यमातून घेता येणार आहे. www.maharesult.nic.in या संकेत स्थळावर निकालाशिवाय निकालाबाबत इतर सांख्यिकीय माहिती मंडळाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर www.mahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.
हेही वाचा - राफेल आणि भारतीय लढाऊ विमाने..
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी अथवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शाळांच्या मार्फत अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. गुण पडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट जुलै तर छायाप्रतीसाठी १८ ऑगस्टपर्यंत http://verification.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर शाळांच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.