मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज (शुक्रवार) घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली.
भारतीय जनता पक्षाकडून दर तीन वर्षांनी स्थानिक पातळीपासून ते अगदी राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होत असतात. त्यानुसार आज (शुक्रवार) महाराष्ट्र राज्य प्रदेश भाजपच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
हेही वाचा - 'लडाखमधील सैनिकांचे मनोबल वाढविल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे धन्यवाद'
भाजपकडून आज घोषीत करण्यात आलेल्या कार्यकारिणीत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस /महामंत्री, एक सरचिटणीस संघटन, 1 कोषाध्यक्ष, 12 सचिव अशी प्रमुख कार्यकारणी आहे. तसेच 7 प्रमुख मोर्चे अध्यक्ष, 8 विविध प्रकोष्ठ, सोशल मीडिया सेल, प्रवक्ते यांचीही घोषणा करण्यात आली आहे.
पक्षाकडून नाराज असलेल्या पंकजा मुंडें यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे.
अध्यक्ष - चंद्रकांत पाटील
सरचिटणीस - सुजीतसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय
उपाध्यक्ष - राम शिंदे, चित्रा वाघ, कपील पाटील, प्रसाद लाड, माधव भांडारी, सुरेश हळवणकर, प्रीतम मुंडे
मुख्य प्रतोद - आशीष शेलार प्रतोद माधुरी मिसाळ
भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र आणि सामाजिक विभाग लक्षात घेऊन सर्व विभागाना प्रतिनिधीत्व देण्यात आल्याचे दिसत आहे. या कार्यकारणीवर देवेंद्र फडणवीस यांची छाप असल्याचे बोलले जात आहे.
पंकजा मुंडे यांना केंद्राची जबाबदारी मिळणार त्यांना वगळता सर्व भाजप नाराज नेत्यांना कार्यकारणी मध्ये जागा देण्यात आली आहे. त्याचबरोबर या पदाधिकारी कार्यकारिणीत 33 टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते आणि प्रसिध्दी माध्यम प्रमुख यांचीही नियुक्ती करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांसोबतच युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा यांच्या प्रमुखांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत.
पक्ष पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांशिवाय 68 जणांची कार्यकारिणी आहे . त्याशिवाय 139 जण निमंत्रित असून 58 जण हे विशेष निमंत्रित असतील . सर्व आमदार - खासदार हे कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्य असतील . त्याशिवाय कोषाध्यक्ष , कार्यालयप्रभारी , सहकार्यालयप्रभारी , प्रदेश कार्यालयमंत्री व सहकार्यालमंत्री याची आज यांचीही घोषणा करण्यात आली.