मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेले राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन होत आहे. आज मराठा आरक्षण, कांजूरमार्ग मेट्रो कारशेड, शेतकरी मदत, अर्णब, कंगना हक्कभंग आदि मुद्यावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची घेतली भेट -
दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकांकडे जाऊन विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार व भाजपचे अन्य नेते सभागृहात उपस्थित होते.
'शक्ती' विधेयक संयुक्त समितीकडे -
शक्ती विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. संयुक्त समितीत दोन्ही सभागृहांचे २१ सदस्य असणार आहेत.
या संयुक्त समितीत विधान परिषदेचे अनिल परब, शशिकांत शिंदे, भाई जगताप, भाई गिरकर, विनायक मेटे, कपिल पाटील हे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
मराठा आरक्षणाची कारवाई अंतिम टप्प्यात - उद्धव ठाकरे
मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी केली आहे. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकेल. तसेच मराठा समाजाचा न्याय हक्क मिळवून देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचा आरोग्य आराखडा तयार झालेला आहे.
महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोललं तर तुरुंगात टाकलं जातं, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या सत्ताधारी भाजपाला विचारला. मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
हातातोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय, अजित पवारांचा विरोधकांना टोला -
तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय, असा टोला असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधक सांगत होते हे सरकार सहा महिन्यात जाईल, परत म्हणाले वर्षात जाईल पण गेलं नाही. विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्ष चांगलेच भिडल्याचं पाहायला मिळालं. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं.
विरोधकांना विचारलेले प्रश्न आणि आरोपावंर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरे दिली. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण प्रश्न, ओबीसींचे प्रश्न असतील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही की कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
राजा उदार झाला, हाती भोपळा - देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तोकड्या मदतीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुरवणी मागण्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना तीनवेळा पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसात शेत, घरदार वाहून गेलं. असं असताना मुख्यमंत्री दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या हस्ते तीन हजारांचा चेक देण्यात आला. सगळं उद्धस्त झालेल्या शेतकऱ्यांला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन हजारांचा चेक दिला. हे म्हणजे 'राजा उदार झाला, हाती भोपळा दिला', अशी परिस्थिती आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाच्या प्रस्तावाचा मुद्दा मांडत कंगना आणि अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख केला असून यानिमित्ताने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. कंगना आणि अर्णबच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं
मुख्यमंत्र्यांचे नाव सन्मानानेच घ्यावे - फडणवीस
अर्णब गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या सरकारला कोणत्याही विषयावर चर्चा करण्यात रस नाही. शक्ती विधेयक अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळेच त्यावर व्यापक प्रमाणात चर्चा होणेही आवश्यक आहे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
या अधिवेशनात शोक प्रस्ताव वगळता आणखी काहीही झाले नाही. शेतकरी प्रश्न, वीज बील यांवर सरकारने आपली भूमीका मांडली नाही, तसेच कित्येक पुरवणी मागण्यांवर सरकार चर्चा करण्यास तयार नसल्याची टीका दरेकरांनी केली.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण, महिला सुरक्षा, शेतकरी प्रश्न, वीज बिल आदींसंदर्भात सरकारचा निषेध करत ही घोषणाबाजी करण्यात आली.
अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौतविरोधातील हक्कभंगावरुन विधानसभेत गोंधळ -
अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौतविरोधातील हक्कभंगावरुन विधानसभेत गोंधळ झाला. मुख्यमंत्र्यांचा आणि मुंबईचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान आहे. त्यामुळे याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
मेटेंना कामकाजात सहभागी होण्यास मज्जाव -
मराठा आरक्षणाबाबत चर्चा करायची असल्यास मेटे यांनी घातलेले विशेष कपडे काढण्याची अट सभापतींनी घातली होती. मात्र, तरीही त्यांनी कपडे काढले नाहीत, हे दुर्दैवी असल्याचे सभापती म्हणाले. त्यामुळे मेटेंना कामकाजामध्ये सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, आरक्षणावरील चर्चेची सूचना सभापतींनी नाकारली आहे.
भाषणात व्यत्यय आणणाऱ्यांना निवडणुकीत पाडणार - मुनगंटीवार
विधानसभेत भाषण करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की जर कोणी माझ्या भाषणात व्यत्यय आणत असेल तर त्यांना मी निवडणुकीत पाडेन. त्यांचे हे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारले व मला निवडणुकीत पाडून दाखवा असे म्हणाले.