मुंबई - सोमवारी राज्यभरात विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडली. राज्यात सरासरी 60.46 टक्के मतदान झाले. तर, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.
राज्यातील विधानसभा मतदानाची आकडेवारी सांगताना बलदेव सिंह म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही.
राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात (83.20 टक्के) झाले. त्याखालोखाल शाहूवाडी (80.19 टक्के), कागल (80.13 टक्के), शिराळा (76.78 टक्के) तर रत्नागिरी (75.59 टक्के) मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात (40.20 टक्के) झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवामध्ये 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले.
जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे..
अहमदनगर 64.93, अकोला 56.88, अमरावती 59.33, औरंगाबाद 65.06, बीड 68.03, भंडारा 66.35, बुलढाणा 64.41, चंद्रपूर 63.42, धुळे 61.90, गडचिरोली 68.59, गोंदिया 64.06, हिंगोली 68.67, जळगाव 58.60, जालना 67.09, कोल्हापूर 73.62, लातूर 61.77, मुंबई शहर 48.63, मुंबई उपनगर 51.17, नागपूर 57.44, नांदेड 65.40, नंदुरबार 65.50, नाशिक 59.44, पालघर 59.32, परभणी 67.41, पुणे 57.74, रायगड 65.90, रत्नागिरी 58.59, सांगली 66.63, सातारा 66.60, सिंधुदुर्ग 64.57, सोलापूर 64.23, ठाणे 47.91, उस्मानाबाद 62.21, वर्धा 62.17, वाशिम 61.33 आणि यवतमाळ जिल्ह्यात 63.09 टक्के मतदान झाले.
इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन..
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी 1 लाख 12 हजार 328 बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी 96 हजार 661 इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स प्रत्यक्ष वापरात होत्या. तर, 24 हजार 625 बीयु, 21 हजार 277 सीयु आणि 28 हजार 992 व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी, प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात 3 हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (522 बीयु, 949 सीयु आणि 1 हजार 974 व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यात 4 हजार 69 इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये 665 बीयु (0.59%), 596 सीयु (0.62%) आणि 3 हजार 437 व्हीव्हीपॅट (3.56%) नादुरुस्त झाल्या.
प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली इव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात/बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.
इव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 152, शिवसेना 89 व इतर 120 अशा एकूण 361 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीसाठी त्वरीत पाठविण्यात आल्या आहेत.
मतदानाची वैशिष्ट्ये :
- पुणे जिल्ह्यातील 215-कसबापेठ मतदारसंघामध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून प्रथमच ‘बार कोडींग’चा वापर करण्यात आला.
- दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी एकूण 5 हजार 435 इतकी मतदान केंद्रे वरच्या मजल्यावरुन तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.
- अतिवृष्टी झाल्यामुळे 259-कराड उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 31 या केंद्राचे मतदानाच्या एक दिवस आधीच स्थलांतर करण्यात आले.
- रविवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस सुरू होता. उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पोलिंग पार्टीच्या दळणवळणामध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र पोलिंग पार्टी वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि मतदान सुरळीतपणे पार पडले.
- रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णालयातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
- विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटींनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले.
- शहरी भागांमध्ये सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहिले.
आदर्श आचारसंहिता (एमसीसी) :
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एफएसटी (1567), एसएसटी (1660), व्हीएसटी (1092) पथके नेमण्यात आली होती. याव्यतिरिक्त दक्ष नागरिकांना आचारसंहिता भंगाची प्रकरणे नोंदविण्यासाठी आयोगाने सी-व्हिजिल हे अँड्रॉईड अॅप उपलब्ध करुन दिले होते.
सोशल मिडिया मॉनिटरिंग :
पोलीस विभागाच्या सायबर शाखेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत सोशल मिडियाचे मॉनिटरिंग करण्यात आले.
जप्तीची प्रकरणे (सीझर्स) :
आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण 67 कोटी 52 लाख रूपये इतकी रोख रक्कम, रुपये 54 कोटी 50 लाख रूपये किंमतीचे सोने, 23 कोटी 21 लाख रूपये किंमतीचे मद्य आणि 20 कोटी 75 लाख रूपये किंमतीचे मादक पदार्थ; याप्रमाणे 165 कोटी 99 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आचार संहितेच्या उल्लंघनाबाबत 2,124 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याव्यतिरिक्त मनाई कायदा आणि अन्न व औषध कायदा या कायद्यांतर्गत 11,506 गुन्हे दाखल करण्यात आले.
मतदार यादी :
या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन 2018च्या जानेवारी महिन्यापासूनच मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु करण्यात आले होते. मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा खूप चांगला परिणाम झाला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या (8 कोटी 85 लाख 65 हजार 547) तुलनेत विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मतदारांची संख्या 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 इतकी झाली.
दिव्यांग मतदार :
भारत निवडणूक आयोगाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी 'सुलभ निवडणूका' (Accessible Elections) हे घोषवाक्य जाहीर केले होते. याअंतर्गत दिव्यांग मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना मतदान करणे सुलभ व्हावे याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. त्याचे चांगले फलित म्हणून या निवडणुकीमध्ये सुमारे 90 हजार नवीन दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये 3 लाख 9 हजार 233 इतके दिव्यांग मतदार होते, तर यावेळी सुमारे तीन लाख 96 हजार 673 इतक्या दिव्यांग व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.
मतदान केंद्र :
यावेळी एकूण 96 हजार 661 इतक्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सन 2014 च्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये एकूण 8 हजार 161 इतकी वाढ झाली आहे. तसेच, आताच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान केंद्रांमध्ये सखी मतदान केंद्र (352), आदर्श मतदान केंद्र (288) दिव्यांग मतदान केंद्र (106) आणि वेब कास्टिंग (10,013) या मतदान केंद्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
निवडणूक कर्मचारी :
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे साडेसात लाख (7,49,374) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे एक लाख (1,04,000) पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. याप्रमाणे सुमारे साडेआठ लाख कर्मचारी या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये 69-अहेरी या मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेले एक पोलीस अधिकारी श्री. बापू पांडू गावडे (वय 45 वर्षे) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान दुपारी दीड वाजता त्यांचा मृत्यू झाला. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेले शिक्षक सर्जेराव भोसले यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
ठाणे येथील नूतन शाळा, रामबाग या ठिकाणी निवडणूक बंदोबस्तावर नेमण्यात आलेल्या जयराम तरे (वय 48 वर्षे) यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्या जीवावरील धोका टळला आहे.
हेही वाचा : एक्झिट पोल : सेना-भाजपला स्पष्ट बहुमत.. महायुतीला १९० ते २३० जागांचा अंदाज, भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष