मुंबई - ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ती नियमानुसार काम करत आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला, असे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी राज ठाकरेंना मिळालेल्या नोटिशीवर केले आहे. 25 ऑगस्टला रासपचा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चौकात जेवढी आमची औकात, तेवढीच मागणी
राज्यात रासपची ताकद वाढत आहे. मागील निवडणुकीत आमचे सहा जिल्हा परिषद सदस्य असताना विधानसभेच्या चार जागा दिल्या होत्या. मात्र आता रासपचे 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 57 जागांची मागणी केली आहे. ही मागणी करताना चौकात जेवढी आमची औकात आहे तेवढीच मागणी आम्ही केली आहे. मात्र 57 जागा मिळणार नाही याचीही कल्पना असल्याचे जानकर म्हणाले.
शक्तीप्रदर्शन करणार
मुंबईत शिवाजी पार्क येथे 25 ऑगस्टला रासपचा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. यावेळी शक्ती प्रदर्शन करण्याचा जानकरांचा प्रयत्न आहे. 5 लाख कार्यकर्ते येण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले सभेला उपस्थित राहणार आहेत.
महायुती फेविकॉल सारखी, तुटणार नाही
जागा वाटप बाबत एक मिटिंग झाली आहे. जेथे विजयी होऊ शकतो, अशा जागा मागणार आहोत. मागील वेळी 4 जागा दिल्या होत्या. आता 57 जागांचे निवेदन दिल आहे, मागील जागेच्या दुप्पट जागा मिळाल्या पाहिजेत. आमची ताकद जिथे आहे, तिथे जागा द्या अशी मागणी आहे. धनगर समाजासाठी या सरकारने अनेक कामे केली आहेत. धनगर समाजाला एसटीच्या सवलती मिळाल्या आहे. भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप महायुती राहणारच. ही महायुती फेविकॉल सारखी आहे. काही लोक देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, पण युती तुटणार नाही. सरकार एनडीएचेच येणार असल्याचा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे.