मुंबई - संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्रने 27 व 28 नोव्हेंबर या कालावधीत मुंबईमध्ये शहीद किसान अस्थिकलश मानवंदना आणि संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन केले आहे. मोदी सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही म्हणून जोपर्यंत संसदेत तीन काळे कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा सरकार आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. यासंदर्भातील आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते.
भाजप शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष - नवाब मलिक
यावेळी मंत्री नवाब मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींना मागे हटवण्यास प्रवृत्त करुन कायदे रद्द करण्यास भाग पाडले. पण, त्यासाठी 700 शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. पण, उत्तर प्रदेश पंजाबमधील आगामी निवडणुकीत भाजपा हारणार, असे दिसत. यामुळे मोदींनी हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण, शेतकऱ्याच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. एमएसपीचा कायदा बनवला पाहिजे, शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळाली पाहिजे. आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत, या त्यांचा मागण्या आहेत. त्या सरकारने मान्य कराव्यात. भाजपा हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही तो शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे.
27 नोव्हेंबरला अस्थिकलश मानवंदना...
दोन दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती देताना प्रकाश रेड्डी म्हणाले की, लखीमपूर खेरी मधील हुतात्मा शेतकऱ्यांचा अस्थिकलश महाराष्ट्रात आणला जात असून 27 तारखेला तो मुंबईतील शिवाजी पार्क, चैत्यभूमी, बाबू गेणू स्मारक, हुतात्मा चौक या पवित्र ठिकाणी नेण्यात येणार असून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप होईल. तर 28 तारखेला संयुक्त किसान मोर्चा आयोजित मेळावा होत आहे. या मेळाव्याला संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टीकैत, डॉ. दर्शन पाल, हनन मुल्ला हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना इतर राजकीय पक्ष शेतकरी व कामगारही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
हे ही वाचा - VIDEO : पगारवाढ नको विलीनीकरण करा; आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका