मुंबई - लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व गृहप्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने आणखी काही महिने हे काम बंदच राहणार आहेत. त्यामुळे महारेराने रेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांच्या पूर्णत्वास तीन महिन्यांची मुदतवाढ देत बिल्डर वर्गाला मोठा दिलासा दिलाय.
रेराच्या नियमानुसार बिल्डरांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी निश्चित केलेल्या तारखेला संबंधित प्रकल्प पूर्ण होणे बंधनकारक आहे.
एक महिना उशीर झाल्यास प्रकल्पाच्या एकूण रक्कमेच्या 10 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते. सध्या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन ते सहा महिने प्रकल्पाचे काम बंद राहणार आहे. त्यामुळे वेळेत प्रकल्प पूर्ण न केल्यास बांधकाम व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ झाली होती.
त्यातूनच प्रकल्प पूर्णत्वास तीन महिने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बिल्डर संघटनांनी केली होती. ही मागणी अखेर महारेराने मान्य केली आहे. 15 मार्चपासून 30 जून 2020पर्यंत रेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आज महरेराने एक परिपत्रक जारी करत संबंधित घोषणा केली. या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.