मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात 'सारथी' या संस्थेस पुण्यातील शिवाजीनगर येथील जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या बुधवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे कित्येक वर्षे रखडलेला संस्थेचा जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे.
संस्थेला मिळणार प्रशस्त जागा
शिवाजी नगर, पुणे येथील आगरकर रस्त्यावरील शालेय शिक्षण विभागाची 4 हजार 163 चौमी इतकी जागा सारथीला देण्यात येणार आहे. या ठिकाणी सारथीचे कार्यालय, अभ्यागत कक्ष, अभ्यास केंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका, कॉन्फरन्स हॉल इ. सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. शासकीय जागा वाटपाबाबतच्या नियमित अटी व शर्तींच्या अधीन राहून महसूल मुक्त व भोगवटामुल्यरहित किंमतीने ही जागा देण्यात देण्यात येणार आहे.
नव्या जागेमुळे दिलासा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले असले तरी अद्याप मराठा समाजातील तरुण आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, आरक्षण मिळण्यापूर्वी मराठा समाजातील तरुणांना शिक्षण क्षेत्रात दिलासा मिळावा यासाठी सारथी संस्था राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. आता या संस्थेच्या इमारतीसाठी जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने मराठा समाजातील तरुणांना दिलासा मिळणार आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथीची स्थापना
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी केल्याचे संस्थेच्या संकेतस्थळावरच म्हटले आहे. संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन करणे अशी कामेही सारथीमार्फत केली जाातात.
हेही वाचा - वाचा...आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय