हैदराबाद - कोरोना विषाणूचे संकट हे वेगळे आहे. या संकटाला कसे तोंड द्यायचे, त्यावर उपाय काय, याची कोणतीही कल्पना महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आणि जगातील शक्तीशाली राष्ट्रांनाही नाही. याही स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने त्याचा योग्य मुकाबला केल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केला आहे.
कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका राज्यातील उद्योगांना बसला आहे, याची कबुली देसाई यांनी दिली, मात्र त्यातून महाराष्ट्र सावरत असल्याचे त्यांनी सांगितले. देसाई म्हणाले, 'महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये यंत्राची चाके फिरायला लागली आहे. जवळपास ५२ हजार उद्योग सुरु झाले असून १३ लाखांपेक्षा जास्त कामगार कामावर परतले आहेत.'
परप्रांतिय श्रमिकांच्या प्रश्नावर देसाई म्हणाले, यूपी-बिहारमध्ये गेलेले मजूर हे परत येतील. ते नाही आले तरी राज्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आहे. शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे की भुमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य दिले पाहिजे. ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका आमची पहिल्या पासून राहिली आहे. आता स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवला जाणार आहे. छोटे-छोटे कोर्सेस त्यांच्यासाठी सुरु केले जाणार असून त्यातून कुशल कामगार कारखान्यांसाठी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.