मुंबई : राज्यामध्ये वाढतात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, मुख्यमंत्री येत्या दोन दिवसात लॉक डाऊन संदर्भात घोषणा करतील असे संकेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहेत. "लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली असून, राज्यातील सद्यस्थिती पाहता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही" असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मात्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला, तरी गरिबांना मदत करण्यासाठी राज्यसरकार तत्पर असेल असंही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव म्हणजे राष्ट्रीय आपत्ती..
केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती नसून, राष्ट्रीय आपत्तीच आहे असे देखील मत बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या कठीण काळात गरिबाच्या हातात थेट पैसे दिले, तर आर्थिक चक्र फिरायला मदत होईल अशा सूचना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केल्या होत्या. केंद्राने देखील गरिबांना मदत होईल यासाठी काम करणे गरजेचे आहे. यापूर्वी झालेल्या लॉकडाऊन मध्ये महाविकास आघाडी सरकारने गरीब, मजूर, स्थलांतरित या सर्वांची मदत केली होती. त्याच प्रमाणे पुढेही राज्य सरकार मदत करत राहील, असे आश्वासन थोरात यांनी दिले.