मुंबई- आत्मनिर्भरतेचा नारा देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भविष्यात सर्व मेट्रो देशातच तयार करून घ्यायचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशात तयार झालेली पहिली विनावाहक मेट्रोची देशात निर्मिती झाली आहे. ही मेट्रो आज (बुधवारी) मुंबईत दाखल होणार आहे.
विनावाहक मेट्रो मंगळवारी दुपारी राज्याच्या वेशीवर पोहोचली. बेळगाव-कोल्हापूर सीमेवर ही मेट्रो आली आहे. ही मेट्रो पुणे मार्गे आज (बुधवारी) मुंबईत येईल, अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त, बी. जी. पवार, यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. ही मेट्रो मुंबईत आल्यानंतर तो क्षण ऐतिहासिक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
बंगळुरूत तयार होत आहेत 63 मेट्रो गाड्या
देशातच मेट्रो गाड्या तयार करण्याचा निर्णय घेत एमएमआरडीएने बंगळुरू येथील बीईएमएल या कंपनीला कंत्राट दिले. त्यानुसार या कंपनीकडून मुंबई आणि एमएमआरमधील (मुंबई महानगर प्रदेश) मेट्रो प्रकल्पासाठी 63 गाड्या अर्थात 576 डबे तयार केले जात आहेत. अत्याधुनिक अशा या मेट्रो गाड्यांचे अनेक वैशिष्ट्य आहेत. पण, याचे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व गाड्या विना वाहक चालणार आहेत. दरम्यान या गाड्याचा एक डबा तयार करण्यासाठी 8 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. मात्र, याच एका डब्यासाठी परदेशात तयार करण्यासाठी 10 कोटी रुपये इतका खर्च येत होता. म्हणजे प्रत्येक डब्यामागे एमएमआरडीएची २ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
23 जानेवारीला निघाली पहिली गाडी
बीईएमएल कंपनीने एका गाडीचे काम पूर्ण केले आहे. मेट्रो 2 अ (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गासाठी प्रामुख्याने या गाड्या बनवल्या जात आहेत. त्यानुसार या दोन्ही प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हे दोन्ही मार्ग सुरू होणार आहेत. त्यामुळेच एमएमआरडीएने पहिली मेट्रो गाडी आल्यानंतर लागलीच ट्रायल रनला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिली मेट्रो गाडी बंगळुरूतून 23 जानेवारीला भल्या मोठ्या ट्रेलर ट्रकमधून मुंबईसाठी रवाना झाली आहे. त्यानुसार आज दुपारी ही गाडी बेळगाव-कोल्हापूर सीमेवर पोहोचली आहे. ही गाडी काही तासातच राज्यात अर्थात कोल्हापूरात दाखल होणार आहे. त्यानंतर ही मेट्रो पुणे मार्गे उद्यापर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. तर 29 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या गाडीचे अनावरण होणार आहे. त्यानंतर गाडीची पहिली झलक मुंबईकरांना पाहायला मिळेल. या पहिल्या स्वदेशी आणि विनावाहक मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना अजून किमान पाच ते सहा महिने वाट पहावी लागणार आहे.
सुरक्षेची व्यवस्था चोख
मेट्रोचे सर्व कोच एसी आहेत. त्यात ऑटोमॅटिक (स्वयंचलित) दरवाजे आहेत. पॅसेंजर अनाऊंसमेंट आणि पॅसेंजर इन्फॉर्मेशन व्यवस्था कार्यरत आहे. प्रवासी ये-जा करताना घसरून पडू नये यासाठी डब्यांचा अंतर्गत पृष्ठभाग हा अँटी स्किडींग करण्यात आला आहे. प्रत्येक डब्यात फायर फायटिंग आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आहे. मेट्रोच्या प्रत्येक डब्यात आणि प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्हीची नजर असेल. प्रवाशांना मदत मागण्यासाठी प्रत्येक डब्यात एक स्विचही देण्यात आला आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सध्या सायकल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, मेट्रोच्या प्रत्येक डब्यात दोन सायकल ठेवण्याची व्यवस्थासुद्धा आहे. अपंग बांधवांना आपल्या व्हीलचेअरसह प्रवास करता यावा, यासाठी प्रत्येक डब्यात स्वतंत्र व्यवस्था आहे.
चालकरहित मेट्रो
मेट्रो मार्गिकेवरील प्रत्येक ट्रेनची कमाल वेग मर्यादा 80 किमी प्रति तास असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मेट्रोला मोटरमन नसेल. चालकरहित (अन अटेंडेड ट्रेन ऑपरेशन) मेट्रो स्वयंचलित पद्धतीने धावणार आहे. परंतु, प्रवाशांना असुरक्षित वाटू नये, यासाठी सुरवातीला मोटरमनसह या ट्रेन धावतील. त्यानंतर स्वयंचलित पद्धतीने त्यांची ये-जा सुरू होईल. वेग नियंत्रण व सुरक्षेसाठी अद्ययावत व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (व्हीव्हीव्हीएफ), ट्रेन कंट्रोल अॅण्ड मॅनेजमेंट सिस्टिमसह विविध प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान या यंत्रणेत आहे. इंटरनेटच्या वापरासाठी प्रत्येक डब्यात ऑप्टिकल फायबरचे नेटवर्कही आहे. या डब्यांचे डिझाईन ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देणारे असून वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
दरम्यान, लाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 जानेवारी बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) प्रकल्पाला भेट देत ही मेट्रो गाडी व तिच्या निर्मितीच्या कामांची प्रत्यक्ष पहाणी केली होती.
हेही वाचा-मेट्रोत जुगार अन् नृत्य प्रकरण : राष्ट्रवादी नेते प्रशांत पवारांवर गुन्हा दाखल
हेही वाचा-ठाणे : स्वदेशी बनावटीच्या मेट्रोची निर्मिती पूर्ण, 2 अ आणि ७ मार्गावर धावणार