मुंबई : मुंबईतील सर्वात पहिले कोरोना रुग्णालय आणि प्रयोगशाळा असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाल्याची घटना शनिवारी समोर आली. गॅस गळती होताच रुग्णालय प्रशासनाने इमारत खाली करून कोरोना रुग्णांना इतर वॉर्डमध्ये हलवल्याने सुदैवाने दुर्घटना टळल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
27 व 28 क्रमांकाच्या वॉर्डात गळती
कस्तुरबा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 27 आणि 28 मध्ये शनिवारी एलपीजी गॅसची गळती झाल्याचे समोर आले. गळती होताच सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी गॅस सप्लाय बंद केला. यानंतर इमारतीमधील 58 रुग्णांना इतर वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. त्यातील 20 रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल आणि गॅस कंपनीचे अधिकारी दाखल झाले असून गॅस गळतीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णांना त्वरित इतर ठिकाणी हलविल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मुंबईतील पहिले कोरोना रुग्णालय
सात रस्ता येथे मुंबई महापालिकेचे कस्तुरबा रुग्णालय आहे. विविध साथीच्या आजारांच्या रुग्णांवर या रुग्णालयात उपचार केले जातात. मागील वर्षी कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यावर या रुग्णालयात सर्वात आधी रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या चाचण्या करणारी पहिली प्रयोगशाळाही याच रुग्णालयात आहे.
हेही वाचा - Delta Variant : नाशिक जिल्ह्यात आढळले डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण