मुंबई - म्हाडाच्या 2018 च्या मानखुर्दमधील 265 विजेत्यांना म्हाडाच्या मुंबई मंडळाने 'जोर का झटका' दिला आहे. 2018 मध्ये मुंबई मंडळाने या घरांची किंमत 25 लाख रुपये निश्चित केली. तर आता तीन वर्षांनंतर घरांच्या किमती अचानक थेट 3 लाख 60 हजारांनी वाढली आहे. त्यानुसार विजेत्यांना पत्र पाठवण्यात आले असून यामुळे विजेते मात्र नाराज झाले आहेत.
हेही वाचा - सरकारविरोधात तरुणांची माथी भडकवून आगीत तेल ओतण्याचे बंद करा, राऊत यांचा विरोधकांना टोला
अल्प गटातील घरे
मुंबई मंडळाने 16 डिसेंबर 2018 मध्ये 1384 घरांसाठी लॉटरी काढली होती. या लॉटरीत मानखुर्द मधील 265 घरांचा समावेश होता. अल्प गटातील संकेत क्रमांक 352 मधील पीएमजीपी मानखुर्द येथील 1बीएचकेच्या (27.88 चौ मी) या 265 घरांसाठी मंडळाने 25 लाख 57 हजार 524 रुपये अशी किंमत निश्चित करत लॉटरी काढली होती.
म्हाडाला आता जाग
लॉटरीत म्हाडाने 265 घरांची किंमत 25 लाख 57 हजार अशी होती. याच किंमती घराचा ताबा मिळणार म्हणत विजेते ही रक्कम जमा करत होते. पण आता आठवड्याभरापासून विजेत्यांच्या हातात पत्र पडू लागली आहेत. ही पत्र वाचून विजेत्यांना धक्का बसत आहे. जे घर आपण लॉटरीत 25 लाख 57 हजारात जिंकलो त्या घरासाठी आता आपल्याला 29 लाख 17 हजार रुपये भरावे लागणार असल्याचे वाचून त्यांना हा धक्का बसत आहे. तीन वर्षांनंतर घरांच्या किमती थेट 3 लाख 60 हजारानी कशा वाढल्या हा प्रश्न त्यांना सतावत आहे. पण म्हाडा मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराच्या किमतीत वाढ करता येते. तशी तरतूद आहे असे म्हणत या वाढीचे समर्थन केले आहे. पण तीन वर्षांनंतर म्हाडाला कशी जाग येते असे म्हणत विजेत्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर ही वाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांना विचारले असता त्यांनी याबाबत सद्या आपल्याकडे माहिती नाही, माहिती तपासून सांगतो असे म्हटले आहे.
हेही वाचा - ...तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन