मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असताना १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण केले जात आहे. लसीकरणाचा वेग कमी आहे. हा वेग वाढवण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळताच लसीकरणाचे लक्ष पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. लोकांनी सहकार्य केले नाही तर मात्र लॉकडाऊन लावावा लागेल, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज बांद्रा बिकेसी येथील जंबो कोविड सेंटरमध्ये कोरोना विषाणूवरील लस घेतली. यावेळी कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे उपस्थित होते. लसीकरणानंतर आयुक्तांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना, मुख्यमंत्र्यांनी नाईलाज म्हणून लॉकडाऊन लावावा असे म्हटले आहे. मुंबईकरांकडून नियमाचे पालन केले जात नसल्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. असेच रुग्ण वाढत राहिले तर मात्र लॉकडाऊन लावावा लागेल, असे आयुक्त म्हणाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर लॉकडाऊन लावावा लागेल. लोकांनी सहकार्य करून लॉकडाऊन टाळावे, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी मुंबईकरांना केले.
मुंबईत 10 लाख लसीकरण झाले आहे. त्यापैकी 42 टक्के लसीकरण महापालिका रुग्णालयात करण्यात आले आहे. दिवसाला 1 लाख लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. हे टार्गेट पूर्ण करता यावे म्हणून व लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी आणखी 36 केंद्रांना परवानगी मागण्यात आली आहे. घरोघरी जाऊन लसीकरणाचीही परवानगी मागीतली आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यास लवकरात लवकर लक्ष पूर्ण करू, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा - नांदेडमध्ये नंग्या तलवारी घेऊन शीखांचा पोलिसांवर हल्ला, पोलीस अधीक्षकासह ४ जखमी
कोरोना आकडेवारी -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईत आतापर्यंत ४ लाख ४ हजार ५६२ रुग्ण आढळून आले आहेत. ११ हजार ६६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ३ लाख ४४ हजार ४९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या ४७ हजार ४५३ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ८५ दिवस इतका आहे.